ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

निरवांगीत बेकायदेशीर उत्खननाची साखळी – अधिकारी झोपेत की संगनमतात?


🔥MK NEWS36 

इंदापूर प्रतिनिधी | सागर समिंदर

इंदापूर तालुक्यातील निरवांगी परिसरात नीरा नदीपात्रातून मध्यरात्री सुरू असलेली वाळू, खरपण आणि दगडांची तस्करी आता उघड गुपित बनली आहे. दिवसाढवळ्या शांतता आणि रात्रीच्या अंधारात धुमाकूळ—अशी दुहेरी भूमिका सध्या या भागात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, निरवांगीतील गायरान गट क्रमांक 1/1 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठवण केली जात असल्याची माहिती समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दिवसा हा अवैध व्यवसाय थांबवला जातो; मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा मोठ्या जोमाने तस्करी सुरू होते. यामध्ये ट्रॅक्टर, डंपरच्या माध्यमातून नीरा नदीपात्राची अक्षरशः लूट चालू आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ही बेकायदेशीर कृत्ये उघडपणे होत असताना तलाठी, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालय इंदापूर यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

“प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही,” अशी उघड चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. स्थानिक स्तरावर अनेकदा तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. शासनाच्या नियमांना हरताळ फासून चालणाऱ्या या काळ्या धंद्याला नेमके खतपाणी कोण घालत आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नीरा नदीच्या पात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून भविष्यात पूरस्थिती किंवा जलस्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता तरी इंदापूर तहसील प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा जागी होणार का? की रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या अवैध साम्राज्यावर कायमच पडदा टाकला जाणार? असा संतप्त सवाल निरवांगीकर उपस्थित करत आहेत.


Translate »
error: Content is protected !!