ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

डॉक्टर-सिस्टर गायब, दरवाजे बंद! इंदापूर तालुक्यात आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा उघड?


🔥MK NEWS36 

इंदापूर तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; उपकेंद्रे ‘कुलूपबंद’, नागरिक हैराण!

इंदापूर प्रतिनिधी : सागर समिंदर

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी आणि रेडणी येथील आरोग्य उपकेंद्रांचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाखेवाडी येथील उपकेंद्र हे बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असून, हे गाव जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले यांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, याच गावातील आरोग्य उपकेंद्रात एकही डॉक्टर, सिस्टर किंवा कर्मचारी हजर नसल्याचे आढळून आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, उपकेंद्राचे आतील दरवाजे कुलूपबंद ठेवून बाहेरील गेट उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्याऐवजी ‘फसवणूक’ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या गावात धाव घ्यावी लागत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दुसरीकडे, रेडणी उपकेंद्राचा प्रकारही तितकाच चिंताजनक आहे. येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. दत्तात्रय महादेव मुंडफणे कार्यरत आहेत. हे केंद्र निरवांगीच्या अंतर्गत येते. मात्र, येथेही डॉक्टर व कर्मचारी नियमितपणे गैरहजर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उपस्थिती नसतानाही संबंधितांचा पगार कसा निघतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नियमाप्रमाणे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून महिन्यातून एकदा आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तीन महिन्यांतून एकदा तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, या तपासण्यांचा कोणताही ठोस परिणाम दिसून येत नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकीकडे शासन ‘आरोग्य सेवा गावागावात’ पोहोचवण्याचा दावा करत असताना, प्रत्यक्षात उपकेंद्रे कुलूपबंद ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. या कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून संबंधित केंद्रे सुरळीत सुरू करावीत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Translate »
error: Content is protected !!