“दौंडमधील दरोडा व अपहरण प्रकरण: माजी नगराध्यक्षांसह ९ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’सह गंभीर गुन्हे दाखल”
🔥MK NEWS36
दौंडमध्ये सशस्त्र टोळीची घरावर धाड: पिस्तूल-कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, तरुणीचे अपहरण आणि जातिवाचक शिवीगाळ
दौंड (विशेष प्रतिनिधी प्रकाश सोनवणे):
शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात रात्रीच्या सुमारास एका घरात घुसून पिस्तूल आणि हत्यारांचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी सुमारे ₹५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केलेच, शिवाय घरातील कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ करत एका २८ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाने संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कुंभार गल्ली येथील पीडित कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात टोळीने आत प्रवेश केला. मुख्य आरोपीने थेट पिस्तूल रोखून कुटुंबीयांना गप्प राहण्याची धमकी दिली, तर त्याच्या साथीदारांनी हातात कोयते आणि तलवारी नाचवत घरात दहशत निर्माण केली.
“आरडाओरडा केला तर गोळ्या झाडून टाकू,” अशी थेट धमकी देत दरोडेखोरांनी घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने बळकावले. या वेळी आरोपींनी कुटुंबीयांना अत्यंत अश्लील आणि जातिवाचक शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, दरोडेखोरांनी घरातील २८ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
माजी नगराध्यक्षांसह ९ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
या घटनेप्रकरणी पीडित महिलेने ३१ जुलै रोजी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशाह अदम शेख यांच्यासह ९ जणांवर नाविनिशी आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेले प्रमुख आरोपी:
नदीम अन्वर शेख
इरफान उर्फ वसीम अन्वर शेख
फैजल मेहबूब काझी
अशफाक समीर शेख
आफताब समीर शेख
शफीक मुलाणी
आरबाज अन्वर शेख
बादशाह अदम शेख (माजी नगराध्यक्ष)
इतर २ ते ३ अनोळखी व्यक्ती
पोलिसांची कारवाई आणि तपास
संशयितांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांन्वये, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (SC/ST Act) आणि शस्त्र कायद्यानुसार (Arms Act) गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव बिरादार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत. फरार आरोपींच्या अटकेसाठी आणि अपहृत तरुणीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.




