गिरीम येथील ‘समाधान लॉज’वर पोलिसांची धडक कारवाई; अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश, एकावर गुन्हा नोंद!
🔥MK NEWS36
दौंड जवळील ‘समाधान लॉज’वर मध्यरात्री पोलिसांचा छापा; अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश, एकावर गुन्हा दाखलन
दौंड (विशेष प्रतिनिधी : प्रकाश सोनवणे):
दौंड तालुक्यातील गिरीम गावच्या हद्दीत असलेल्या वायरलेस फाटा परिसरातील ‘समाधान लॉज’वर दौंड पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून टाकलेल्या या छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून, याप्रकरणी एका व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी (३० जुलै २०२६) पहाटे पावणेएकच्या (१२.४५ वा.) सुमारास दौंड पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान आरोपी रितेश कुमार रमतारी पासवान (वय २६) हा स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी सहा महिलांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी पोलीस हवालदार निखिल बाळासाहेब जाधव यांनी दौंड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी रितेश पासवान याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३३/२०२६ अन्वये ‘स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६’ चे कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.




