“आरक्षणावरून उलथापालथीची शक्यता – दौंडमध्ये उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू”
🔥MK NEWS 36
दौंड नगरपरिषद आरक्षण सोडतीची प्रतीक्षा – इच्छुक उमेदवार संभ्रमात
कोमल सोनवणे,
दौंड (प्रतिनिधी)
दौंड शहरामध्ये येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांचे वारे सुरू झाले असून, इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप आरक्षण सोडत जाहीर न झाल्याने शहरातील राजकीय समीकरणे उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपरिषदेला अनुसूचित जाती (SC) आरक्षण लागू झालेले नाही. यावेळी नगरपरिषदेतील काही प्रभागांना SC आरक्षण लागू होईल, अशी तज्ञांची चर्चा सुरू असून, इतर प्रभागांना सर्वसाधारण आरक्षण लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची यादी प्रचंड वाढलेली दिसून येते.
शहरातील ज्येष्ठ नेते, नवे कार्यकर्ते आणि उमेदवार सर्वजण आरक्षण सोडतीच्या प्रतिक्षेत असताना, मतदार राजाच्या मनात मात्र बदलाची हाक असल्याचे सूत्रांकडून समजते. नागरिक चांगल्या उमेदवारालाच पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त होत असून, या निवडणुकीत मतदार बदल घडवून आणतील, अशी जोरदार चर्चा शहरभर रंगली आहे.
दरम्यान, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांची खरी मोर्चेबांधणी आणि राजकीय समीकरणे स्पष्ट होतील. त्यामुळे दौंडकरांचे डोळे आता राज्य शासनाकडे लागलेले आहेत.




