काळेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा; ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण..!
🔥MK NEWS 36
अखेर हिंगणीबेर्डी मधून काळेवाडी स्वतंत्र; ग्रामस्थांत समाधानाचा उत्साह
सचिन आटोळे,
तालुका प्रतिनिधी, दौंड
दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीतून अखेर काळेवाडी (ज्योतीबा नगर, मुगाव) हे गाव विभक्त होऊन स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळविण्यात यश आले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीसाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार मोठा असल्याने विकासकामे करणे कठीण जात होते. त्यामुळे लहान गावांचा विकास काही प्रमाणात मागे पडत होता. अखेर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना व एकजुटीला यश मिळाले असून, काळेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयानंतर गावातील विकासकामांना गती मिळणार असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शैक्षणिक सुविधा, तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी आता स्वतंत्र नियोजन करता येणार आहे.
या ऐतिहासिक क्षणानिमित्त दौंड तालुक्याचे आमदार मा. श्री. राहुल दादा कुल यांचा ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. काळेवाडीला स्वतंत्र दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच या प्रक्रियेत सहकार्य केलेल्या सर्व शासकीय अधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
काळेवाडीच्या स्वायत्त ग्रामपंचायतीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून आगामी काळात ग्रामविकासाचा नवा अध्याय सुरु होणार आहे.



