ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

दत्तकला इंजिनिअरिंगच्या NSS शिबिरात सामाजिक बांधिलकीचा जागर..!


🔥MK NEWS36

व्यक्तिमत्व विकासासोबत समाजविकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे मोलाचे योगदान – डॉ. अनिल बनसोडे
दौंड (प्रतिनिधी):
व्यक्तिमत्व विकासाबरोबरच समाजविकासाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) महत्त्वाची भूमिका बजावत असून, श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी व मानवतावादी दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. डॉ. अनिल बनसोडे यांनी केले.
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूसन्स, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, स्वामी चिंचोली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी मौजे रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्वयंसेवक व स्वयंसेविकांशी संवाद साधत शिबिर काळात करण्यात आलेल्या श्रमदान व विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
डॉ. बनसोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगत, जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिबिरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा घडतो, याविषयी मार्गदर्शन केले. “स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त NSS उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. उच्च शिक्षण घेत असताना समाजाप्रती संवेदनशील राहून मानवतेच्या मूल्यांवर आधारित सेवा दिली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कमलकिशोर शर्मा, प्रा. मीना कुलकर्णी (व्याख्यात्या), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री बारवकर, प्रा. मदिना तांबोळी, प्रा. भापकर, प्रा. देवकाते तसेच मौजे रावणगावचे सरपंच, उपसरपंच, NSS स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कमलकिशोर शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन NSS स्वयंसेविका कु. प्रिती धापके हिने केले, तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री बारवकर यांनी आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!