ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सहानुभूती, संयमी स्वभाव आणि माणुसकीची ताकद; खडकी जिल्हा परिषद गटात आप्पासाहेब पवारांची लढत चर्चेत..!


🔥MK NEWS36

सहानुभूती, संयमी स्वभाव आणि माणुसकीची ताकद; खडकी गटात आप्पासाहेब पवारांची लढत चर्चेत…!

सचिन आटोळे
(विशेष राजकीय प्रतिनिधी)
दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब नानासाहेब पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मातब्बर उमेदवारांचे आव्हान असले तरी ते कसे हाताळायचे याचा प्रदीर्घ अनुभव आप्पासाहेबांकडे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आप्पासाहेब पवार यांचा शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेणारा स्वभाव हीच त्यांची खरी राजकीय ताकद मानली जाते. पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना त्यांनी कधीही कोणत्याही गावावर अथवा घटकावर अन्याय न करता, पक्षभेद न ठेवता विकासकामे केल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. माणसे जोडणे आणि सर्वांना समजून घेणे हीच त्यांची राजकीय ओळख राहिली आहे.
विशेष म्हणजे या जिल्हा परिषद गटात स्वतःचे मतदान नसतानाही कार्यकर्ते आणि नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पक्षांतर्गत राजकारणात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली असून, केवळ वापर करून घेतले गेले, अशी खंतही समर्थकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच “न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या राजकारणासाठी” ते पुन्हा रिंगणात उतरल्याचे सांगितले जात आहे.
आप्पासाहेबांचे स्मित हास्य, साधी राहणी आणि थेट संपर्क यामुळे मतदारांवर त्यांची विशेष मोहिनी असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक केवळ विजयासाठी नसून, एक सर्वसामान्य माणूस मतदारांच्या मनात किती स्थान मिळवू शकतो, याची चाचणी असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. पैशाच्या प्रभावाला बळी न पडता मतदार मतदान करतील, असा ठाम विश्वास आप्पासाहेबांनी व्यक्त केला असून, विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर ही शक्यता मान्य केली आहे.
खडकी, राजेगाव, मलठण आणि देऊळगाव राजे या गावांतील मतदान निर्णायक ठरणार आहे. या मतांसाठी आप्पासाहेबांकडे चाणक्य नीती असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. काहींकडून त्यांच्यावर आरोप व बदनामीचे प्रयत्न होत असले तरी, मतदार त्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. “राजकारणात बदनामी होते, पण त्याहीपलीकडे माणुसकीची एक शक्ती असते,” अशी भावना या गटात व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे विविध पक्षांतील काही विरोधकही आप्पासाहेबांच्या विजयासाठी गोपनीय मदत करण्यास तयार असल्याची चर्चा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक प्रचार करण्याची तयारी असल्याचे समजते. मात्र हे सर्व आप्पासाहेबांच्या ‘ग्रीन सिग्नल’ची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे.
काही कार्यकर्त्यांना मनापासून आप्पासाहेबांना मतदान करायचे असले तरी पक्षातील पदांमुळे त्यांना विरोधी उमेदवारांचा प्रचार करावा लागत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र अंतःकरणाने आणि मतदानाच्या वेळी ते वेगळा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक केवळ राजकीय गणितांची नव्हे, तर माणुसकी, विश्वास आणि सहानुभूतीच्या ताकदीची लढत ठरणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Translate »
error: Content is protected !!