ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“सभा, रॅली, बॅनर लावण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक – बारामती पोलिसांचे निर्देश”


🔥MK NEWS36 

बारामतीत आदर्श आचारसंहिता लागू; नियमांचे काटेकोर पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन..!

बारामती : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या निर्देशानुसार दिनांक १५ मार्च २०२६ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी सभा, मोर्चे, प्रचार रॅली, मिरवणुका आयोजित करणे, ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, तसेच बॅनर, पोस्टर, फ्लेक्स किंवा भित्तीपत्रके लावणे यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

परवानगीशिवाय कोणतेही कार्यक्रम आयोजित करणे, सार्वजनिक संपत्तीवर अनधिकृत जाहिराती लावणे, मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, जातीय अथवा धार्मिक भावना भडकविणारी वक्तव्ये करणे किंवा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल अशी कोणतीही कृती करणे हे कायद्याने दंडनीय असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारची कृत्ये आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून विशेष गस्त, नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.


Translate »
error: Content is protected !!