निमसाखरजवळ रणवरे वस्ती येथे अपघात; कारने स्प्लेंडरला दिली धडक..!
🔥MK NEWS36
अकलूज-वालचंदनगर रोडवर कार-दुचाकीची धडक; दहावीतील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत, प्रकरण आपसात मिटवले..!
सागर समिंदर/प्रतिनिधी/अकलूज : अकलूज-वालचंदनगर मार्गावर निमसाखर जवळील रणवरे वस्ती परिसरात चारचाकी व दुचाकी यांच्यात धडक होऊन दहावीतील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली. मात्र संबंधित दोन्ही पक्षांनी परस्पर समेटाने हे प्रकरण मिटवून घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज-वालचंदनगर रोडवरून एक चारचाकी आय-ट्वेंटी कार जात असताना समोरून येणाऱ्या हिरो स्प्लेंडर दुचाकीला धडक बसली. या दुचाकीवर इयत्ता दहावीमध्ये शिकणारी दोन मुले प्रवास करत होती. अचानक झालेल्या या धडकेत दुचाकीवरील विद्यार्थ्यांना पायाला मुका मार लागला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना मदत केली. सुदैवाने या अपघातात गंभीर दुखापत झाली नाही. दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
दरम्यान, संबंधित वाहनचालक व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी परस्पर चर्चा करून हे प्रकरण आपसातच मिटवून घेतल्याचे समजते. त्यामुळे या घटनेची कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नाही.
या अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र परिस्थिती लवकरच सुरळीत झाली. स्थानिक नागरिकांनी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून तसेच विद्यार्थ्यांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.




