“बारामतीत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश; सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी”
🔥MK NEWS36
बारामती प्रतिनिधी | विशेष वृत्त
हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून अॅट्रॉसिटी कायद्याच्या धमकीवर खंडणी उकळण्याचा प्रकार उघड; बारामती पोलिसांची मोठी कारवाई
बारामती : शहरात हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका शासकीय अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून, त्याला अॅट्रॉसिटी कायद्याच्या धमकीवरून लाखोंची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 142/2026 अन्वये भा. न्या. सं. कलम 308(2), 308(7), 356(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध आणि संगनमताने रचलेला हनी ट्रॅप असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी असून, बारामती येथील एका प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून जात असताना त्यांचा काही व्यक्तींशी परिचय झाला होता. त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली सुरू झालेला संवाद पुढे जाणीवपूर्वक जवळीक वाढवत जाळ्यात ओढण्याच्या उद्देशाने केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. मात्र, दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर आरोपींकडून व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत बदनामीची भीती दाखवली गेली.
यानंतर आरोपी व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने फिर्यादी यांना खोट्या बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल 50 लाख रुपयांची मागणी केली. पुढे ही मागणी 25 लाखांवर आणून शेवटी 10 लाखांपर्यंत कमी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुरवणी जबाबानुसार, 5 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत आरोपींकडून एकूण सहा वेळा फोन करून खंडणीची मागणी करण्यात आली. फिर्यादी यांच्याकडे आयफोन असल्यामुळे कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नसल्याने त्यांनी कॉल स्पीकरवर ठेवून दुसऱ्या मोबाईलद्वारे संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या रेकॉर्डिंगमध्ये “पैसे दिले नाहीत तर बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू”, “मीडियात बदनामी करू” अशा स्पष्ट धमक्या देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, आरोपींकडून दबाव टाकत फिर्यादींकडून 1 लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही रक्कम बारामती एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मध्यस्थांमार्फत देण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
तसेच आरोपींकडून फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून, मोबाईल तपासणी करत जवळपास दोन तास मानसिक दबाव टाकत पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करून नोकरी गमावण्याची व सामाजिक बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणात हनी ट्रॅप, व्हिडिओ ब्लॅकमेलिंग, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आणि खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून पोलिसांनी फिर्यादीकडील सर्व डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. या पुराव्यांचा हॅश व्हॅल्यू पंचनामा करण्यात आला असून आवाजाची वैज्ञानिक तपासणी (FSL), सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, उपअधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास केला जात आहे.
✅नागरिकांना आवाहन :
अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे वैयक्तिक संपर्क ठेवणे टाळावे. कोणतीही खाजगी माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत. हनी ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंगचा संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे.




