फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून दौंडमध्ये ज्येष्ठाची आत्महत्या; 13 जणांवर गुन्हा दाखल..!
🔥MK NEWS36
फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून दौंडमध्ये ज्येष्ठाची आत्महत्या; 13 जणांवर गुन्हा दाखल
कोमल सोनवणे
दौंड प्रतिनिधी
दौंड शहरातील महादेव गल्ली परिसरात फायनान्स कंपनी व थर्ड पार्टी वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी संबंधित फायनान्स कंपनीचे कथित कर्मचारी व वसुली अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी Daund Police Station येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2026 अन्वये बीएनएस कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत तब्बल 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अव्दैत विवेक गटणे (वय 37, व्यवसाय खासगी नोकरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय 72, रा. महादेव गल्ली, दौंड) यांना मागील एक वर्षापासून आरोपींकडून सातत्याने आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. आरोपींनी “आमचे फायनान्स कंपनीतील कर्मचारी ओळखीचे आहेत” असे सांगून वेळोवेळी पैसे, सोने व मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र त्या परत न केल्याने गटणे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते.
फिर्यादीनुसार, वारंवार पैसे व मौल्यवान वस्तू परत मागूनही आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. यामुळे विवेक गटणे हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी विवेक गटणे यांनी एका वहीत संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेमुळे दौंड शहरात खळबळ उडाली असून फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम करत आहेत.




