नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या आश्वासनावर पाणी; कामगार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात..!
🔥MK NEWS36
बारामती | प्रतिनिधी
बारामती नगर परिषद येथील कंत्राटी कर्मचारी व जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने किमान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन व अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषदेसमोर सकाळी ६ वाजल्यापासून कामगार काम बंद ठेवून आंदोलन करणार असून सकाळी ११ वाजल्यापासून शेकडो कामगार अमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी झालेल्या आंदोलनावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी एक महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. “दिलेला शब्द पाळला गेला नाही, त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
कामगारांनी किमान वेतनाची अंमलबजावणी, थकीत देयके आणि इतर कामगार हक्कांबाबत प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन केल्यास काही ठेकेदारांकडून कामावरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला. “कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केल्यास सर्व कामगार रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे कंत्राटी कामगारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले की, “जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”
या बैठकीस संघटनेचे शहराध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सहसंघटक ओम शिंदे, सरचिटणीस सुरज वाडेकर तसेच महिला पदाधिकारी व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




