ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

रस्ता अडवून जबरदस्ती करणारा व जबरी चोरी करणारा जेरबंद; बारामती शहर पोलीस स्टेशनची कठोर कारवाई..!


🔥MK NEWS36 

बारामतीत पोलिसांची दुहेरी धडक कारवाई; जबरी चोरी व तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी येरवडा कारागृहात..

प्रतिनिधी|बारामती (जि. पुणे जिल्हा) – शहरात घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी वेगवान व परिणामकारक तपास करत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृह येथे करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात कायद्याची जरब अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

🔴 जबरी चोरी प्रकरण; आरोपी सिद्धार्थ घाडगे जेरबंद..!

दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी शिवाजी चौक परिसरात फिर्यादीला मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा रजि. क्र. 63/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती व सखोल चौकशीच्या आधारे आरोपी सिद्धार्थ संतोष घाडगे (वय 31, रा. सटवाजी नगर, इंदापूर चौक, बारामती) याचा सहभाग निष्पन्न केला. त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अंगझडतीदरम्यान गुन्ह्यातील रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली.

न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी मंजूर झाली. पुढील सुनावणीनंतर न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावण्यात आली असून आरोपीस येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

🔴 तरुणीचा रस्ता अडवून जबरदस्ती; आरोपी ओंकार जाधव कारागृहात

दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी देशमुख चौक परिसरात एका तरुणीचा (नाव गोपनीय – “निर्भया”) रस्ता अडवून जबरदस्ती, मारहाण व लज्जाभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली. आरोपी ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, बारामती) याने संबंधित तरुणीची गाडी थांबवून चावी हिसकावली व तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी नेल्याचा आरोप आहे. तेथे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लज्जास्पद कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी मंजूर केली होती. पुढील सुनावणीनंतर न्यायालयीन कोठडी देत आरोपीस येरवडा केंद्रीय कारागृहात पाठविण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचविणे, अपहरण, मारहाण व जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

👮‍♂️ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई..!

ही दोन्ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाने तांत्रिक व मानवी माहितीचा प्रभावी वापर करत दोन्ही प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण केला.

📢 पोलिसांचा स्पष्ट संदेश..!

बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,

महिलांविरुद्ध कोणताही गुन्हा सहन केला जाणार नाही.

जबरी चोरी, मारहाण, धमकी किंवा सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्याच्या चौकटीत शिक्षा भोगावीच लागेल.

दोन्ही आरोपींना येरवडा कारागृहात दाखल करण्यात आल्याने शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!