“पाणी नाही तर पाणीपट्टी नाही!” – रेणुका नगरचा थेट इशारा, फलटण चौकात आंदोलनाची ठिणगी..!
🔥MK NEWS36
🔴 बारामतीत पाणीप्रश्नावर संतापाचा स्फोट! रेणुका नगर–मुल्ला वस्तीतील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
बारामती : शहरातील रेणुका नगर व मुल्ला वस्ती परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. नगरपरिषदेकडून जाणूनबुजून पाणीपुरवठा कमी दाबाने केला जातो किंवा अनेक वेळा पूर्णपणे बंद ठेवला जातो, असा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
“आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तर पाणी मिळण्याचा अधिकारही आहे. पाणीच मिळत नसेल तर पाणीपट्टीचे बिल का भरावे?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, नळातून पाणी येत नसतानाही भरमसाठ बिल आकारले जात असल्याने संताप अधिकच तीव्र झाला आहे.
स्थानिकांच्या मते, पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांचे राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे काही प्रभागांना जादा पाणी दिले जाते, तर रेणुका नगर परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. “आमचं पाणी हरवलं आहे; ते कोण शोधून देणार?” असा उपरोधिक सवालही रहिवाशांनी केला.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी थेट पार्थ पवार यांना निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाने तात्काळ दखल न घेतल्यास शेवटचा पर्याय म्हणून फलटण चौक येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“योग्य वेळी, योग्य दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा रेणुका नगर व मुल्ला वस्तीतील नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने वेळेत तोडगा काढला नाही, तर बारामतीत पाणीप्रश्नावर मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.




