हॉटेलच्या बिलाच्या वादातून रक्तरंजित मारहाण; दोघे अटकेत, दोघे फरार..!
🔥MK NEWS36
जिवासाठी धावले पोलीस; बारामतीत प्राणघातक हल्ल्यानंतर दोघे अटकेत, दोघे फरार
बारामती, दि. 23 (प्रतिनिधी) – हॉटेलच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात जखमी व्यक्तीचा जीव पोलिसांच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे वाचला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपीसह एक जण फरार आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2026 अन्वये भा.न्या.स. कलम 109, 61(2), 118(2), 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय 53, रा. खांडज, ता. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी दुपारी मोरगाव रोडवरील ग्लोबल हॉटेलसमोर प्रणव डिजीटल दुकानाजवळील मैदानात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
अक्षय जगताप व त्याच्या साथीदारांनी लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने फिर्यादीच्या उजव्या पायावर व छातीवर गंभीर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यावेळी एका साथीदाराने “कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ,” अशी धमकी देत नागरिकांना दहशतीखाली ठेवले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस विलंब न लावता वाहनाद्वारे मेडिकल कॉलेज, बारामती येथे दाखल केले. डॉक्टरांच्या त्वरित उपचारांमुळे जखमीचा जीव वाचला असून पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवून संशयित विक्रम जगताप (रा. खांडज) व जयदीप भागवत भोसले (रा. पाहुणेवाडी) यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अक्षय सुनिल जगताप (रा. माळेगाव कारखाना) व त्याचा साथीदार महादेव उर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फरार आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा हेल्पलाईनवर कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




