सहा–सात महिन्यांची गर्भवती महिला खून, मदनवाडी पुलाखाली मृतदेह कुजलेल्या अवस्थेत..!
🔥MK NEWS 36
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे धक्कादायक घटना: मदनवाडी पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत महिला मृतदेह आढळला..
प्रतिनिधी
इंदापूर/ भिगवण: इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखाली एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला असून, मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, मृत महिलेच्या डाव्या हातावर “रविराज” नावाचा टॅटू असल्याचे दिसून आले आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही, तसेच खून कोणी आणि का केला, याचा तपास सखोल पातळीवर सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, तपासात असे दिसून आले आहे की मृत महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर होती. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या दरम्यान परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मृतदेहाला सुमारे पाच ते सहा दिवस झाले असावेत. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. प्राथमिक तपासानुसार, ही घटना खूनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भिगवण पोलिस सध्या सखोल तपास करत आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन तपासल्या जात आहेत. पोलिसांच्या मते, या महिलेची ओळख पटवणे हे सध्या सर्वात मोठे आव्हान आहे. ओळख झाल्यानंतरच खुनामागील कारणे आणि आरोपींचा शोध घेणे सुलभ होईल.
तपास अधिकारी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत.




