ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत होमगार्ड जवानावर मारहाण; आरोपीवर BNS अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल…!


🔥MK NEWS36

बारामतीत होमगार्ड जवानावर मारहाण; आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल
बारामती, दि. १५ फेब्रुवारी : महाशिवरात्री यात्रेदरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्ड जवानावर मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2026 अन्वये आरोपी विकास दादा लोंढे (रा. अनंतनगर आमराई, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 115(2), 351(2)(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्री निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गर्दी नियमन व वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्ड जवान सिंध्दार्थ भारत शिंदे हे अधिकृत गणवेशात शासकीय कर्तव्य बजावत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बॅरेकेटींगमधून कोणत्याही वाहनास प्रवेशबंदी करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीने मोटारसायकल बॅरेकेटींगमधून आत नेण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्यास नियम समजावून सांगितल्यावर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली व प्रत्यक्ष मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक ठिकाणी वर्दीधारी कर्मचाऱ्यावर हात उगारल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी किंवा होमगार्ड जवानांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
होमगार्ड दल हे महाराष्ट्र पोलीस दलाचे पूरक सहाय्यक बल असून कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे तसेच सार्वजनिक बंदोबस्तात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कायद्यानुसार होमगार्ड हे ‘पब्लिक सर्व्हंट’ या श्रेणीत मोडतात आणि त्यांच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व होमगार्ड दलास सहकार्य करावे आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या जवानांचा सन्मान राखावा. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले जाईल, असे प्रभारी पोलीस निरीक्षकांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!