“कागदावर हजेरी, प्रत्यक्षात गैरहजेरी – निरवांगी व पळसमंडळ आरोग्य विभागाचा कारभार संशयात!”
🔥MK NEWS36
“आरोग्य सेवेत ढिसाळपणा; जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?”
दिनांक : 29 एप्रिल 2026
प्रतिनिधी : सागर समिंदर
“कागदावर हजेरी, प्रत्यक्षात गैरहजेरी – निरवांगी व पळसमंडळ आरोग्य विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात!”
निरवांगी व पळसमंडळ परिसरातील आरोग्य विभागाचा कारभार सध्या गंभीर प्रश्नचिन्हाखाली आला असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निरवांगी येथील कनिष्ठ सहाय्यक क्लार्क श्रीमती डफळ तसेच पळसमंडळ येथील आरोग्य सेवक यांच्यावर “कामावर अनुपस्थित, पण कागदावर उपस्थित” असा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष कामावर क्वचितच दिसतात, मात्र उपस्थिती रजिस्टरमध्ये नियमित सही दाखवली जाते. इतकेच नव्हे, तर वेळोवेळी बिलांची प्रक्रिया आणि कागदपत्रे मात्र व्यवस्थित पूर्ण केली जात असल्याने या प्रकारामागे संगनमताचा संशयही व्यक्त होत आहे.
निरवांगी येथे चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित क्लार्क “रणगांवला गेल्या आहेत” असे सांगितले जाते, तर रणगांव येथे गेल्यावर “त्या किरकोळ रजेवर आहेत” अशी माहिती दिली जाते. या परस्परविरोधी उत्तरांमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पळसमंडळ येथील आरोग्य सेवकाबाबतही तक्रारींचा पाऊस पडत आहे. प्रत्यक्ष सेवेसाठी अनुपस्थित राहून केवळ कागदोपत्री कामकाज पूर्ण करणे, वेळेवर हजेरी दाखवणे आणि बिलांची पूर्तता करणे—या प्रकारामुळे आरोग्य सेवेचा दर्जा खालावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोग्य विभाग हा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा घटक असताना, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. “एक दिवस हजर राहून उर्वरित दिवस गैरहजर राहणे, हा कोणता कारभार?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकारी यांची भूमिका देखील संशयास्पद ठरत आहे. इतक्या तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाचे मौन अधिकच खटकत आहे.
आता प्रश्न असा उभा राहतो की,
आरोग्य विभागाचा हा ‘खेळखंडोबा’ थांबवण्यासाठी शासन व प्रशासन जागे होणार का?
की नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार?
स्थानिक नागरिकांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.




