संविधानाची जबाबदारी निभावण्याचे आवाहन – फडणवीस
🔥MK NEWS 36
समाजकल्याण अधिकारी पदावर २२ जणांना नियुक्तीपत्रांचे वितरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसेवेचा संदेश..
मुंबई प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून समाजकल्याण अधिकारी (गट-ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना आज (शनिवार) सह्याद्री अतिथीगृह येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती.
नवनियुक्त अधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन कायम बाळगावा.”

या सोहळ्यास सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी शासनातील आपली भूमिका जबाबदारीने पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला.



