उपमुख्यमंत्र्यांची वाहतूक सुधारणा स्वप्नवत; बारामतीत मात्र गोंधळ कायम?
🔥MK NEWS 36 संपादकीय
बारामतीत वाहतूक विभागाचा दिखावा – मूळ प्रश्नांकडे कानाडोळा..
बारामतीत वाहतूक विभागाचे सुटलेले नियंत्रण आणि त्यामागील कारभारावर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात एक ना अनेक ठिकाणी ट्राफिक जाम, बेशिस्त वाहतूक, अव्यवस्थित पार्किंग, शोरूम व व्यापाऱ्यांचे अतिक्रमण असे ठळक प्रश्न प्रलंबित असताना, वाहतूक विभाग मात्र फक्त काळ्याकाचा काढणे, हायवा-डंपिंग व काही पॅसेंजर गाड्यांवर कारवाई यापुरतेच आपले कर्तव्य समजत आहे, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे.

रेल्वे टेशन समोरील शाळेतील वाहतूक कोंडी व बेशिस्त पार्किंग सकाळचे ०८:०० वा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग उभारला, त्यासाठी विशेष सोयी-सुविधा निर्माण झाल्या. पण प्रत्यक्षात बारामती वाहतूक शाखेचे चित्र अगदी उलट आहे. फोटोशूट, फेसबुक पोस्ट आणि दिखावूपणावर भर देऊन मूळ प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
शहरातील रस्त्यावर दररोज होणारी धक्काबुक्की, पादचाऱ्यांची होणारी दमछाक, व्यापाऱ्यांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण, शोरूममधून थेट रस्त्यावर आलेल्या वाहनांची गर्दी – हे सर्व प्रश्न कायम आहेत. पण या प्रश्नांकडे डोळेझाक करून फक्त नागरिकांना धाक दाखवणाऱ्या कारवाया केल्या जात आहेत.

टीसी कॉलेज जवळील सातव चौक येथील बेशिस्त पार्किंग..
स्थानिकांचे म्हणणे आहे की, ट्रान्सपोर्ट लॉबी आणि काही दबंग वाहनमालकांना सूट देत वाहतूक विभाग फक्त सर्वसामान्यांना जाचक पद्धतीने पावत्या फाडण्यात व्यस्त आहे. यामागे अर्थकारण लपलेले आहे का? हा गंभीर प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
फेसबुकवर पोस्ट करून, स्वतःला “शिस्तप्रिय” म्हणून सादर करण्याऐवजी वाहतूक प्रमुखांनी खरे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशी सर्वसामान्यांची ठाम मागणी आहे. नाहीतर वाहतूक विभाग हा फक्त दिखाव्यापुरता आणि “फोटोशूट-फेसबुकपुरता” आहे, अशी जनतेत धारणा पक्की होत चालली आहे.




