राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सिप्ला दौरा बैठक..!
🔥MK NEWS 36
सिप्ला कंपनीला सार्वजनिक उपक्रम समितीची भेट
सचिन आटोळे
तालुका प्रतिनिधी
दौंड, दि.२३ ऑगस्ट : माननीय आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक उपक्रम समितीने आज कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील औषध निर्मिती करणाऱ्या सिप्ला कंपनीला भेट दिली.
या भेटीदरम्यान समिती सदस्यांनी कंपनी परिसरातील औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणपूरक उपाययोजना यांचा आढावा घेतला. त्याचबरोबर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही कंपनी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समितीला सर्व संबंधित माहिती सादर करण्यात आली असून परस्पर संवादातून समितीने सकारात्मक अभिप्राय दिला.

यावेळी MIDC, MPCB, कामगार सुरक्षा विभाग यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांच्या कामकाजाबाबत तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही समितीने मुद्देसूद चर्चा केली.
या बैठकीला समितीचे सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार निलेश राणे, आमदार हेमंत ओगले, आमदार रईस शेख, आमदार उत्तम जानकर, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते, तसेच MIDC चे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, उपजिल्हाधिकारी संतोष भिसे, बारामतीचे रिजनल ऑफिसर हनुमंत पाटील, कामगार विभागाचे उपायुक्त वाघ व वाळके, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कार्तिकेय लंगोटे व डोके, दौंडचे प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, तसेच स्थानिक जनप्रतिनिधी कुरकुंभचे सरपंच सुनील खंडाळे, पांढरेवाडीच्या सरपंच सौ. निताताई राजेंद्र कोंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीतून कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षित व पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांना रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे संकेत मिळाले आहेत.



