ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची लागणार वर्णी? शेख, कटारिया, नारंग यांची नावे चर्चेत..!


🔥MK NEWS36 

स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची लागणार वर्णी? शेख, कटारिया, नारंग यांची नावे चर्चेत..!
सचिन आटोळे
(विशेष राजकीय प्रतिनिधी)
दौंड : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचे लक्ष या नियुक्त्यांकडे लागले असून, कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने शहरातील राष्ट्रवादीची ताकद कमी होऊ नये, अशी भावना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदावर गुरुमुख नारंग यांची नियुक्ती झाल्यास ही पोकळी भरून निघेल व पक्षाला बळ मिळेल, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.


सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे नगरपालिकेत नऊ नगरसेवक आहेत. मात्र मागील टर्मच्या तुलनेत ही संख्या कमी झाल्याने पक्षाला स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून ताकद वाढवणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडूनही स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत दौंड शहरातील पूर्वीचे राष्ट्रवादीचे बडे नेते यांचा मुलगा व सून यांचा पराभव झाल्याने मंडळाची ताकद नव्याने अधोरेखित करण्यासाठी ‘बादशाह भाई’ यांची वर्णी लागावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर मानले जात आहे.
तसेच नगरपालिकेतील अनुभवसंपन्न व सर्वमान्य चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचे नावही चर्चेत आहे. शांत, संयमी नेतृत्व आणि वाद टाळण्याची भूमिका यामुळे त्यांना कोणाचाही विरोध नसतो. ते स्वतःहून पदाची मागणी करत नसले तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते जबाबदारी स्वीकारतात, असे कार्यकर्ते सांगतात.
गेल्या टर्ममध्ये विरोधकांच्या कारस्थानांमुळे काही चुका झाल्या होत्या. मात्र यावेळी नागरिक हित संरक्षण मंडळ त्या चुका टाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संख्याबळ कमी असलेल्या विरोधकांनाही विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची ताकद मंडळाकडे असल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या संख्याबळावरून नागरिक हित संरक्षण मंडळाला दोन स्वीकृत नगरसेवक पदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना एक पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आगामी काळात होणाऱ्या राजकीय समझोत्यांवर अंतिम गणित अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट आहे.


Translate »
error: Content is protected !!