ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत भव्य मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न..!


🔥MK NEWS36 

बारामतीत मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

बारामती (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ, बारामती यांच्या वतीने जिजाऊ भवन येथे आयोजित करण्यात आलेला भव्य मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडला. राज्यभरातून उपवर वधू-वर, घटस्फोटीत, विधवा-विधुर तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच अण्णासाहेब पाटील व स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमांनाही अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची रंगत वाढली.

यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, पंचायत समिती सभापती किरण तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण इंगळे, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, राजेंद्र खराडे, मराठा सेवा संघाचे प्रदीप शिंदे, विजय तावरे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

मेळाव्यात ४७७ वरांचे व ३८० वधूंचे बायोडाटा एलईडी स्क्रीनद्वारे सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात एका घटस्फोटीत व दोन नववधू-वरांची जुळवाजुळव यशस्वी झाली असून, गट चर्चांमधून आणखी अनेक विवाह जुळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

तालुकाध्यक्ष संभाजी माने यांनी आपल्या भाषणात मेळाव्यास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. दरवर्षी १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त अशा प्रकारचा मेळावा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ विविध कक्ष कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वधू-वर सूचक मंडळ, सारथी, उद्योजक व स्वयंरोजगार कक्ष, प्लेसमेंट, वैद्यकीय मदत व शैक्षणिक सल्ला कक्षांचा समावेश असून, समाजबांधवांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी उपस्थित वधू-वरांना शुभेच्छा देत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजना बारामती सहकारी बँकेमार्फत राबविल्या जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बारामती शहराध्यक्ष सौ. अर्चनाताई सातव यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!