ई-पेपरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“महिला वकिलाचे लैंगिक शोषण अन् फसवणूक; बारामतीत पोलीस हवालदारावर गंभीर गुन्हा दाखल”


🔥MK NEWS36 

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाचे लैंगिक शोषण; बारामतीत पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

बारामती (विशेष प्रतिनिधी):

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन विश्वास संपादन करणे, दीर्घकाळ सहजीवन ठेवून लैंगिक शोषण करणे, आर्थिक फसवणूक करणे आणि जन्माला आलेल्या मुलीचा स्वीकार करण्यास नकार देणे, अशा विविध गंभीर आरोपांखाली बारामती पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश मोहन जाधव (व्यवसाय- पोलीस हवालदार, बकल क्र. ५६१, सध्या नियुक्ती खडकी, पुणे; मूळ रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका महिला वकिलाने (ओळख गोपनीय ठेवण्यासाठी काल्पनिक नाव “निर्भया”) बारामती शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ८१, ३५१(२), ३५१(३) व ३१८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

✅नेमके काय आहे प्रकरण?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपी रमेश जाधव याची पीडित महिला वकिलाशी ओळख झाली होती. आरोपीने स्वतःचे पहिले वैवाहिक जीवन संपुष्टात आले असून पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे सांगत, फिर्यादीशीच कायदेशीर विवाह करण्याचे आश्वासन दिले. या भावनिक आश्वासनांना बळी पडत महिला वकिलाने त्याच्यावर विश्वास ठेवला.

दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीने बारामती येथे येत आर्थिक अडचण असल्याचे सांगून पीडितेकडून ₹४०,०००/- रोख घेतले. त्यानंतर येथील एका लॉजवर नेऊन पुन्हा विवाहाचे वचन देत प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

📍मंदिरात साखळी बांधून बनावट लग्न

पीडितेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आरोपीने नातेवाईकांसह तिच्या घरी जाऊन लग्नाची चर्चा केली. तसेच एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी पीडितेच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून बांधत “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस” असे सांगितले. त्यानंतर जेऊर व निंभोरे परिसरात तिला ‘पत्नी’ म्हणूनच वागवत काही काळ सहजीवन घालवले.

🗞️गर्भवती राहिल्यानंतर नकार व फसवणूक

सहजीवनादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली. मात्र, गर्भधारणेनंतर आरोपीच्या वर्तनात बदल झाला. त्याने पीडितेची कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत तिच्यावर संशय घेण्यास व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी पीडित महिलेला कन्यारत्न झाले. ती मुलगी आरोपीचीच असल्याचे फिर्यादीत नमूद आहे; मात्र आरोपीने मुलीला आणि पीडितेला स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. याशिवाय, विविध कारणांसाठी पीडित व तिच्या नातेवाईकांकडून घेतलेली मोठी रक्कमही त्याने परत केली नाही.

💥धमक्या आणि दबाव

गुन्हा दाखल करू नये किंवा तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपीने पीडित महिलेला अश्लील व अपमानास्पद भाषेत धमक्या दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

💢तांत्रिक व डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरु

या प्रकरणात पोलीस आता व्हॉट्सअॅप चॅट, कॉल डिटेल्स, व्हिडिओ, छायाचित्रे, लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि आर्थिक व्यवहारांचे बँक रेकॉर्ड्स जप्त करून त्यांची पडताळणी करत आहेत.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:

“या गुन्ह्याचा बारामती शहर पोलिसांकडून निष्पक्ष व सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाबाबत कोणाकडेही उपयुक्त माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.”

— प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे


Translate »
error: Content is protected !!