निवडणुकीपूर्वी हात जोडले, विजयानंतर पाठ फिरवली? बारामतीत ‘नगरसेवक विरुद्ध जनसेवक’ चर्चा..!
🔥MK NEWS36
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीनंतरचा आरसा : नगरसेवक विरुद्ध जनसेवक
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती नगरपालिकेची निवडणूक पार पडून १ तारखेला नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी व पदभार स्वीकारण्याचा सोहळा झाला. लोकशाहीतील हा औपचारिक टप्पा पूर्ण झाला असला, तरी प्रत्यक्षात शहरातील राजकीय व सामाजिक वातावरणात मात्र अस्वस्थ करणारी चर्चा सुरू झाली आहे. कारण निवडणुकीनंतर अपेक्षित असलेली “जनसेवा” आणि प्रत्यक्षात दिसणारे “सत्तेचे वर्तन” यामध्ये वाढत चाललेली दरी आता उघडपणे जाणवू लागली आहे.
निवडणूकपूर्व काळात घराघरांत जाऊन हात जोडणारे, विनंती करणारे, आश्वासनांची पेरणी करणारे अनेक चेहरे आज अचानक दुरावल्याचे चित्र आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवून मतदान केले, त्या नागरिकांना साधे आभार मानण्याचीही गरज काही नव्या नगरसेवकांना वाटत नसल्याची भावना कार्यकर्ते आणि मतदारांमधून व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर निवडणुकीत जीव तोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातून “आभाराचे पेढे” देण्याइतकीही संवेदनशीलता काही ठिकाणी दिसून आली नाही, अशी खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे.
याच्या उलट चित्र दुसऱ्या बाजूला देखील आहे. निवडणूक जिंकले अथवा हरले याची पर्वा न करता, जे काही जनसेवक वर्षानुवर्षे सर्वसामान्यांमध्ये राहून छोटे-मोठे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मदतीची कामे करत होते, ते आजही त्याच पातळीवर सक्रिय आहेत. सत्ता, पद किंवा तिकीट नसतानाही लोकांसाठी उभे राहणारे हे चेहरे आज “खरे जनसेवक” म्हणून नागरिकांच्या मनात आदराने पाहिले जात आहेत. मात्र, याच लोकांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान, उमेदवारी किंवा पद मिळाले नाही, ही वस्तुस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते.
तिकीट वाटप करताना पक्षांनी नेमके काय निकष लावले? लोकांमध्ये काम करणारे, विश्वासार्ह चेहरे बाजूला पडून केवळ समीकरणे, गटबाजी, स्वार्थी राजकारण यावर उमेदवार ठरले का? आणि जर तसे असेल, तर लोकशाहीत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण काम यांचे महत्त्व किती दिवस टिकणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
आज अनेक कार्यकर्ते अपमान आणि आश्वासन या दोनच गोष्टींवर समाधान मानायला भाग पाडले जात आहेत. “पुढच्या वेळी बघू”, “योग्य संधी देऊ” अशी आश्वासने देत वेळ मारून नेण्याचे राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे का, हाही प्रश्न आहे. पक्षनिष्ठा दाखवूनही जर शेवटी कुचंबना आणि दुर्लक्षच पदरी पडणार असेल, तर अशा लोकांची सहनशक्ती किती काळ टिकणार, हा मुद्दा गांभीर्याने विचारात घ्यावा लागेल.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बारामतीतील नागरिकांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पक्षाचा उमेदवार म्हणून मतदान केले गेले, की प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीसाठी? निवडणुकीनंतरही जो सामान्य माणसात राहतो, त्याच्याशी नाते टिकवतो, तोच खरा लोकप्रतिनिधी मानायचा की फक्त निवडणूक जिंकलेला नगरसेवक?
आगामी काळात हे प्रश्न अधिक तीव्र होणार आहेत. पक्ष खरोखरच काम करणाऱ्या जनसेवकांना योग्य पद, सन्मान आणि जबाबदारी देणार का? की पुन्हा एकदा स्वार्थ, गटबाजी आणि सोयीस्कर राजकारण याचाच वरचष्मा राहणार?
MK NEWS 36 येत्या काळात या विषयावर “नगरसेवक विरुद्ध जनसेवक” ही विशेष मालिका सादर करणार असून, प्रत्येक पैलूचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.
वाचत रहा… प्रश्न विचारत रहा… कारण लोकशाही टिकवायची असेल, तर उत्तरांची गरज आहे.




