उसाच्या ट्रकवरील सैल रस्सी ठरली काळ; काँग्रेसचे युवा नेते अकबर शेख यांचे अपघाती निधन..!
🔥MK NEWS36
काँग्रेसचे युवा नेते अकबर करीम शेख यांचे अपघाती निधन; दौंड शहर हळहळले.!
दौंड | प्रतिनिधी
दौंड शहर काँग्रेसचे युवा व धडाडीचे कार्यकर्ते अकबर करीम शेख (वय ३८) यांचे मंगळवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे दौंड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अकबर शेख हे आपली पत्नी नसरीन अकबर शेख (वय २८) यांच्यासह होंडा अॅक्टिव्हा (क्रमांक MH 42 BQ 4965) वरून शालीमार चौकातून गजानन सोसायटीकडे जात होते. यावेळी दौंड-नगर रोडवर योगराज हॉटेलसमोर टाटा कंपनीच्या उसाने भरलेल्या ट्रक (क्रमांक MH 12 FZ 7493) वरील सैल सोडलेली रस्सी अचानक उडून त्यांच्या अंगावर पडली.
ही रस्सी अकबर शेख यांच्या गळ्याभोवती आवळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर पत्नी नसरीन शेख यांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हेत्रे पुढील तपास करीत आहेत.
दौंड काँग्रेसवर शोककळा..!
अकबर करीम शेख हे दौंड शहर काँग्रेसचे अत्यंत सक्रिय, मनमिळाऊ आणि युवकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा करीम शेख यांचे सुपुत्र होते. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी अल्पावधीतच पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
नुकत्याच झालेल्या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढवून पक्षनिष्ठा आणि जनसमर्थन सिद्ध केले होते. शहरात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.
न भरून येणारी हानी..!
अकबर शेख यांच्या अकाली निधनामुळे दौंड शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.
या दुःखद प्रसंगी शेख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.




