ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“रात्रीच्या अंधारात शेतजमिनीतून माती उपसा! तक्रारीनंतर महसूल-पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष”


🔥MK NEWS36 

दौंडमध्ये शेतजमिनीतील माती चोरीचा आरोप; तहसीलदार व पोलिसांकडे तक्रार

“अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास माती नेल्याचा शेतमालकांचा दावा; चौकशी करून कारवाईची मागणी”

दौंड | प्रतिनिधी प्रकाश सोनवणे

दौंड तालुक्यातील मौजे दौंड येथील गट क्रमांक १४/११ मधील सामायिक शेतजमिनीमधून अज्ञात व्यक्तींनी माती चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शेतजमीन मालक सुधीर भीमा सोनवणे व अजय अर्जुन सोनवणे यांनी दौंड तहसीलदार तसेच दौंड पोलिस निरीक्षकांकडे लेखी तक्रार अर्ज साद केला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शेतजमिनीतील माती अंदाजे सात ते आठ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी उत्खनन करून नेली. या प्रकारामुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, माती नेणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित शेतजमिनीतून मातीचे उत्खनन करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, माती नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांची माहिती उपलब्ध आहे का, तसेच या प्रकारामागे नेमके कोण आहेत, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून उत्खननाचे स्वरूप व प्रमाण तपासणे, तसेच माती वाहतुकीसंदर्भातील आवश्यक परवानग्यांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांकडूनही तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जातो का, याकडे लक्ष लागले आहे.

“शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती परवानगीशिवाय कोणी नेली असेल, तर संबंधितांचा शोध घेऊन कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी तक्रारदार सुधीर सोनवणे व अजय सोनवणे यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तहसील प्रशासन व पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीनंतरच माती नेण्याचा प्रकार नेमका कसा घडला, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि आवश्यक परवानग्या होत्या का, याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Translate »
error: Content is protected !!