“बारामती हादरली: संशयास्पद गोळ्यांमुळे तरुणीचा मृत्यू; भरबाजारात पेटवली चालती दुचाकी; शहरात ‘बुलेट’ चोरटेही सक्रिय”
🔥MK NEWS36
“बारामती शहर पोलिसांची विविध प्रकरणांत धडक कारवाई: तरुणीचा संशयास्पद मृत्यू, भरचौकात गाडी पेटवणारा गजाआड; तर बुलेट चोरांचा शोध सुरू”
बारामती (प्रतिनिधी):
बारामती शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बारामती शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाईचा धडाका लावला आहे. एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या घटनेत अत्यंत वर्दळीच्या सुभाष चौकात स्वतःची दुचाकी पेटवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच शहरात सक्रिय असलेल्या बुलेट चोरट्यांची टोळी पोलिसांच्या रडारवर आली असून संशयितांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
१. संशयास्पद गोळ्यांमुळे तरुणीचा मृत्यू; तरुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत ६ ऑगस्ट रोजी एका उच्चशिक्षित तरुणीचा (बी.एएससी. अॅग्री व एमपीएससी परीक्षेची तयारी करणारी) आकस्मिक मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. गजानन अपार्टमेंट, इंदापूर रोड, बारामती) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, अथर्व व मयत तरुणी यांच्यात विवाह ठरला होता. मात्र, मृत्यूपूर्वी काही दिवस आधी आरोपीने तिला जबरदस्तीने काही गोळ्या खाण्यास दिल्याचा आरोप आई व मैत्रिणीने केला आहे. घटना घडली त्या दिवशी आरोपी तरुणीला टी.सी. कॉलेज व परिसरात घेऊन गेला होता. रात्री प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने आईला फोनवर आरोपी गोळी खाण्यास देत असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अधिक तपास करत आहेत. (संवेदनशील प्रकरण असल्याने मयत तरुणीचे नाव व ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.)
२. सुभाष चौकात भर रस्त्यावर मोटारसायकल पेटवली; बारामती पोलिसांची तत्परता
दुसऱ्या घटनेत, १० ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास शहरातील अत्यंत वर्दळीच्या सुभाष चौक मार्केट परिसरात गणेश विठ्ठल माने (वय ३९, रा. कैकाडगल्ली, बारामती) याने स्वतःची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (MH-13-Q-0673) भर रस्त्यात जाणीवपूर्वक पेटवून दिली.
हातात पेटती सिगारेट घेऊन तो आरडाओरडा करत मोटारसायकलीभोवती फिरत होता. मुख्य बाजारपेठेत पेट्रोल भरलेली गाडी पेटवल्याने स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल चौधर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार लोंढे पुढील तपास करत आहेत.
३. बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांची टोळी सक्रिय; पोलिसांचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन
बारामती शहर व तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकली चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रगतीनगर व तांदुळवाडी रोड परिसर येथून क्लासिक ३५० व हंटर ३५० अशा एकूण तीन बुलेट गाड्या चोरीला गेल्या आहेत. तालुका हद्दीतही तीन गाड्या चोरीस गेल्याची नोंद आहे.
याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. अपार्टमेंट व सोसायटीच्या पार्किंगमधील गाड्यांना लक्ष्य केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांचे आवाहन:
दुचाकीधारकांनी केवळ हॅण्डल लॉकवर अवलंबून न राहता अतिरिक्त डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चेन लॉकचा वापर करावा. वाहनांमध्ये जीपीएस (GPS) ट्रॅकर बसवावा तसेच पार्किंग परिसरात सीसीटीव्हीची सोय ठेवावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ १०० किंवा ‘डायरेक्ट ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर सर्व कारवाया पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांचे पथक करत आहे.




