“तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’चा जागर; १५० हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी”
🔥MK NEWS36
तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
बारामती : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत तांदूळवाडी येथील शिवनगर गणेश मंडळाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय, बारामती येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शिबिरात परिसरातील नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी केली. यावेळी रोगनिदान, आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन, रक्त तपासणी, ईसीजी तसेच इतर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना औषधांचे वाटपही करण्यात आले.
याशिवाय नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड मोफत काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात १५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. बापू भोई, डॉ. मयूर बेलदार, श्री. पंढरी करणे, सौ. जाई साळी, श्री. राहुल नककावार, सौ. योगिता गडदरे, रियाज शेख, डॉ. घुले सर, श्री. महेश खोपडे यांच्यासह शिवनगर कला क्रीडा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य तपासणीबरोबरच विविध शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.



