“दौंडमध्ये मुरुमाची चोरटी वाहतूक उघड; हायवासह १०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त”
🔥MK NEWS36
दौंडमध्ये मुरुमाची चोरटी वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा
हायवा वाहनासह १० लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त; महसूल अधिकाऱ्याशी दमदाटी केल्याचा आरोप
दौंड | प्रतिनिधी प्रकाश सोनवणे
देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर मार्गावर शासकीय रॉयल्टी न भरता मुरुमाचे (गौणखनिज) उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान हायवा वाहनासह एकूण १० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शासकीय काम करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याशी शिवीगाळ व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता देऊळगाव राजे गावच्या हद्दीत देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी शुभांगी बबन गुंड या शासकीय काम करीत असताना हायवा क्रमांक MH-14-LR-5587 मधून मुरुमाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार, हायवा वाहनामध्ये अंदाजे ५ ब्रास मुरुम, ज्याची किंमत सुमारे ३५ हजार रुपये, तसेच अंदाजे १० लाख रुपये किमतीचा १० टायर भारतबेंझ ट्रक आढळून आला. त्यामुळे एकूण १० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अंबादास शेळके (पूर्ण नाव माहीत नाही) आणि नरेंद्र दादा कोरे, दोघेही रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे, यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६९०/२०२६ नोंद करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 132, 351(1), 352, 3(5) तसेच गौणखनिज उत्खनन अधिनियमातील कलम 4 व 21 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शासकीय कारवाई सुरू असताना संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताच्या बाह्या वर करून अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ३११ म्हेत्रे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
(टीप : वरील मजकूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असून, आरोपींवरील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल.)



