“बारामतीत खळबळ: दोन गटांतील राडा मिटवायला गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; ५ जणांवर गुन्हा”
🔥MK NEWS36
“बारामतीत पोलिसांवर हल्ला; ५ जणांसह साथीदारांवर गुन्हा दाखल”
बारामती (प्रतिनिधी):
शहरातील आमराई परिसरात दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना १० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना धमकावल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पाच मुख्य आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहितेसह आर्म्स ॲक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा प्रस्तावही तयार केला जात आहे.

शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे आणि गणेश शंकर पाथरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
✅मध्यरात्री दोन गटात राडा, ‘डायल ११२’ मुळे पोलीस पोहोचले
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी पहाटे दीडच्या सुमारास आमराई परिसरात दोन गटांमध्ये जोरदार भांडण, मारामारी आणि गोंधळ सुरू होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि तुषार शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
📍वाद मिटवताना पोलिसांवरच फौजदारीपात्र बलप्रयोग
सार्वजनिक शांतता धोक्यात आल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत बेकायदेशीर जमाव पांगवण्याचा आणि दंगा शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी शुभम कांबळे, विपुल अवचिते, शुभम अवचिते, ओम पाटोळे आणि गणेश पाथरकर यांनी पोलिसांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली. आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणत पोलिसांना धमकावले आणि त्यांच्यावर फौजदारीपात्र बलप्रयोग केला. या झटापटीत पोलीस शिपाई नेवसे जखमी झाले.
🚨विविध कलमान्वये गुन्हे दाखल, प्रतिबंधक कारवाई सुरू
या गंभीर घटनेनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(१), १२१(१), १३२, १९५(१), २२१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
💥”पोलीस व्यवस्थेवरील हल्ला खपवून घेणार नाही”
“पोलीसांवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो कायद्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेवरचा हल्ला आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि लोकसेवकांवर हात उचलणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर पावले उचलली जातील,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
💢तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू
सध्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर सायंटिफिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भंडारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.




