MK NEWS36 चा इम्पॅक्ट : वरवंड दलित तरुणी आत्महत्या प्रकरणात अखेर कार गुन्हा दाखल!
🔥MK NEWS36
वरवंड दलित तरुणी आत्महत्या प्रकरणाला अखेर वाचा — MK NEWS36 च्या बातमीचा इम्पॅक्ट, कार गुन्हा दाखल!
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
वरवंड येथील दलित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला तब्बल दीड महिन्यानंतर अखेर न्यायाच्या प्रक्रियेची पहिली पायरी गाठली आहे. MK NEWS36 ने सातत्याने लावलेल्या बातम्यांच्या मालिकेनंतर दिनांक २२ डिसेंबर रोजी अखेर कार (FIR) गुन्हा दाखल करण्यात आला. प्रश्न असा आहे की इतका उशीर का? आणि हा उशीर कोणाच्या फायद्यासाठी?
काल २३ डिसेंबर रोजी डीवायएसपी साहेबांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले, संपूर्ण हकीकत समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे — आता भेटीगाठी करून काय उपयोग, जेव्हा वेळेवर कारवाईच झाली नाही?
तक्रार द्यायला गेलो होतो, पण पोलीस टाळाटाळ करत राहिले — वडिलांचा आरोप?
मयत तरुणीच्या वडिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“आम्ही एकदा नाही तर दोनदा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलो होतो. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट उद्या, फॉरेन्सिक रिपोर्ट उद्या म्हणत आमची तक्रारच घेतली नाही.”
हा गंभीर आरोप आहे. कायद्याने तक्रार घेतलीच पाहिजे, तपास नंतर करायचा असतो. मग पोलीस प्रशासनाने तक्रार घेण्यास नकार का दिला? हा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
तपास अधिकारी जर मनमानी करत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे?
न्याय देणारी यंत्रणाच जर अन्याय करत असेल, तर सामान्य नागरिकाने न्यायासाठी कुठे जायचे? तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता का? की कोणाला वाचवण्यासाठी वेळकाढूपणा केला गेला? हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
मुख्य आरोपी तरुण सापडणार की फरार होणार?
सर्वात गंभीर बाब म्हणजे —
ज्या तरुणामुळे या आत्महत्येची सुरुवात झाली, त्या तरुणाला जवळपास दीड महिना उलटूनही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेच नव्हते.
आता गुन्हा दाखल झाल्यानंतर जर तो तरुण फरार झाला, तर याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
आता जबाबदारी पोलीस प्रशासनाची
कार गुन्हा दाखल झाला हे स्वागतार्ह आहे, पण इतक्यावर थांबून चालणार नाही.
संबंधित तरुणाला तात्काळ ताब्यात घ्या
सखोल चौकशी करा
आत्महत्येमागील नेमकी कारणे उघड करा
दोषींवर कठोर कारवाई करा
हेच त्या दलित तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला खरे न्याय देणे ठरेल.
MK NEWS36 राहणार पाठपुरावा करत
हे प्रकरण इतक्यावर थांबणार नाही. तपासात कसलीही दिरंगाई, दडपशाही किंवा पक्षपात झाला, तर त्याचा संपूर्ण सखोल पर्दाफाश केला जाईल, असा इशारा MK NEWS36 च्या माध्यमातून देण्यात येत आहे.
उशिरा का होईना… पण त्या निष्पाप दलित तरुणीला न्याय मिळायलाच हवा!




