दौंड हादरले! भीमनगरात वादातून हाणामारी – युवकाचा खून, एक गंभीर जखमी
🔥 MK NEWS 36
दौंडमध्ये वाढती गुन्हेगारी! भीमनगरात युवकाचा खून, एक जखमी
प्रतिनिधी :
कोमल सोनवणे, दौंड
दौंड तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होत आहे. दर दोन दिवसांनी होणारे गटागटातील भांडण, हाणामाऱ्या यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री भीमनगर परिसरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला असून, दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या खुनात सामील असलेल्या काही संशयितांना अटक केली आहे. मात्र अद्याप आरोपींची संपूर्ण नावे व पार्श्वभूमी समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात वादातून झालेल्या हाणामारीतून ही हत्या घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंडमध्ये अल्पशा कारणावरून वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
नागरिकांकडून सतत कडक कारवाईची मागणी होत असून, पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.




