नाताळाच्या निमित्ताने गरजू चिमुकल्यांना ‘सांता’ची भेट; सचिन भाऊ जगदाळे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम..!
🔥MK NEWS36
नाताळाचा खरा अर्थ जपणारा सामाजिक उपक्रम;
सचिन भाऊ जगदाळे मित्रपरिवाराने दिला गरजू चिमुकल्यांना आनंदाचा घास..!
बारामती| प्रतिनिधी:डिसेंबर महिना आला की नाताळ, नाताळ म्हटलं की सॅन्टाक्लॉज, गिफ्ट्स, सुट्ट्या आणि आनंद यांची आठवण प्रत्येकाच्या मनात येते. डोक्यावर टोपी घातलेला, हातात पोटली घेऊन येणारा सॅन्टाक्लॉज ही संकल्पना लहानग्यांच्या विश्वात खास स्थान राखून असते. मात्र समाजातील गोरगरिबांच्या, हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या मुलांसाठी हा सण केवळ कल्पनेपुरताच मर्यादित राहतो. अशा मुलांना ना गिफ्ट्सचं स्वप्न बघता येतं, ना नाताळच्या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, हीच सामाजिक वास्तवाची कटू बाजू आहे.

याच वास्तवाला सामाजिक संवेदनशीलतेची किनार देत सचिन भाऊ जगदाळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने नाताळनिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला. आठ नंबर शाळेत शिक्षण घेणाऱ्या, कष्टकरी व गरजू कुटुंबातील चिमुकल्यांसाठी नाताळच्या निमित्ताने पंचपक्वान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले.
या शाळेत प्रामुख्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची, गरिबांची मुले शिक्षण घेत असून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फारच मोजके असतात. अशा मुलांना नाताळच्या दिवशी पोटभर आणि प्रेमाने दिलेले जेवण मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे, हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमादरम्यान चिमुकल्यांनी पंचपक्वान्नाचा मनसोक्त आस्वाद घेतला. जेवणासोबत मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य उपस्थितांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आणणारे होते. कोणताही गाजावाजा न करता, केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
नाताळ म्हणजे केवळ सजावट, गिफ्ट्स किंवा उत्सव नव्हे; तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचवणे, हाच नाताळाचा खरा संदेश आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. सचिन भाऊ जगदाळे मित्रपरिवाराचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, खऱ्या अर्थाने नाताळ साजरा करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.




