ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

एम.डी. ड्रग्स रॅकेटमधील फरार आरोपी बारामतीत पकडला — पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन!


🔥MK NEWS 36 

५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी गजाआड केले
मुंबईतील चर्चित ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामतीत अटक; पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

बारामती|प्रतिनिधी दि. २५ :
बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि गुप्त पद्धतीने कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. मुंबईतील तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (पूर्व), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय हद्दीत १४ सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याशी संबंधित आरोपीला अखेर बारामती पोलिसांनी गजाआड केले.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्यावर कारवाई सुरू होती. यातील समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा आरोपी दीर्घकाळ फरार होता.

दरम्यान, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून बारामती पोलिसांना फरार आरोपी बारामती परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे गुप्तपणे तपास सुरु केला असता आरोपी बारामती शहरातील ‘ब्रँड रिव्हर’ या कपड्यांच्या दुकानात काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

यानंतर, पोलिसांनी आखलेल्या हुशार योजनेनुसार पथकाने परिसरात पाहणी केली आणि आरोपीची ओळख पटवून क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान समीर शेख याने तुळींज पोलीस ठाण्यातील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी असल्याची कबुली दिली. तत्काळ या माहितीची नोंद घेऊन आरोपीस पुढील तपासासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, तसेच पोलीस अंमलदार निलेश वाकळे आणि राहुल लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच अटक केलेल्या आरोपीस तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राख, हवालदार कांबळे आणि कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात कायदेशीर प्रक्रियेनंतर सुपूर्द करण्यात आले आहे.

बारामती पोलिसांच्या या कारवाईमुळे मादक पदार्थ विरोधी मोहिमेला चालना मिळाली असून, फरार आरोपींना आश्रय मिळणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


Translate »
error: Content is protected !!