बारामती पोलीसांचा धडाका: अवैध शस्त्र आणि दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना गजाआड..!
🔥MK NEWS36
बारामतीत गुन्हेगारीवर पोलीसांचा मोठा धडाका..!
गावठी पिस्तूलसह एक जण अटकेत; दहशत माजवणारा सराईत गुन्हेगारही गजाआड..
बारामती |प्रतिनिधी– बारामती शहरात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवलेल्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हा प्रकटीकरण विभागाने दोन महत्त्वपूर्ण कारवाया करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा प्रतिबंध बसला आहे.
गावठी पिस्तूलसह १९ वर्षीय युवक अटक
12 नोव्हेंबर 2025 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस कर्मचारी अभिजीत कांबळे, अमीर शेख, रामचंद्र शिंदे, अक्षय सीताप, दत्तात्रेय मदने, सागर जामदार, विशाल शिंदे व गिरीश नेवसे हे पेट्रोलिंग करत असताना एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
त्याची ओळख प्रेम दयानंद कांबळे (वय 19, रा. भोईटे हॉस्पिटल समोर, इंदापूर रोड, बारामती) अशी झाली असून त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवड-शेट्टी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात कोणाकडे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
दहशत निर्माण करणारा ‘बिट्टू’ जाधव अखेर गजाआड
दुसऱ्या कारवाईत शहरातील दहशत निर्माण करणारा, खंडणी वसुली, मारहाण आदी अनेक गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असलेला सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बिट्टू रमेश जाधव (रा. तांदळवाडी वेस टकार कॉलनी, बारामती) याला अटक करण्यात आली आहे.
बिट्टू जाधव याच्यावर आमराई परिसरातील चित्रपट विभागात काम करणारे अतुल साबळे यांना मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर तो सतत आपले ठिकाण बदलत सोलापूर व इतर ठिकाणी लपून राहत होता.
12 नोव्हेंबर 2025 रोजी तो बारामतीतील घरी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हा प्रकटीकरण पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण कारवाई
दोन्ही कारवाया पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गिल (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक पुणे मान. रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मान. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती मान. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडे-शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या.
या कौशल्यपूर्ण कारवायांमुळे बारामती शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलीसांचे कडक नियंत्रण कायम असल्याचे चित्र दिसत आहे.




