आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत महेश जगदाळे समर्थकांसह बीजेपीत..!
🔥MK NEWS36
महेश जगदाळे यांचा बीजेपीमध्ये दमदार नागरिक हित प्रवेश; प्रभाग ५ ची गणिते बदलणार
दौंड, प्रतिनिधी —
दौंड शहरातील काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी, मनमुटाव व दुर्लक्षामुळे वैतागलेल्या काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तसेच तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश जगदाळे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे दौंडच्या स्थानिक राजकारणात मोठे राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली जगदाळे यांनी पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा केली. पक्षातील वारंवार होणारा अपमान, तिकीट नाकारणे, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि गटबाजीमुळे निर्णय घ्यावा लागल्याचे जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या निर्गमनामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याची प्रतिक्रिया शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांतून उमटत आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यात श्री. गणेशजी बिडकर (निरीक्षक), वासुदेव काळे, सभापती गणेश जगदाळे, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, हरिभाऊ ठोंबरे, सुनील शर्मा, फिरोज खान यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अनेक कार्यकर्त्यांनीही जगदाळे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला.
महेश जगदाळे यांच्या प्रवेशामुळे विशेषतः प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणुकीची सर्व गणिते बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या सत्ता समीकरणांना नवीन धक्का बसला असून बीजेपीला स्थानिक पातळीवर नवी ताकद मिळाली आहे.
या प्रवेशामुळे दौंड शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत नव्या राजकीय रेखांकनाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.




