ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम; दौंड पोलिसांकडून हद्दपार आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा सपाटा..!


🔥MK NEWS36

दौंड, दि. २२ मे २०२६ प्रतिनिधी कोमल सोनवणे

दौंड शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर दौंड पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. वारंवार शरीराविरुद्ध गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये त्यागी शांताराम रणदिवे, आकाश दीपक माने व गौख उर्फ अक्षय अशोक काळे (रा. सिद्धार्थनगर, दौंड) यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

तसेच गोवंश हत्या करून धार्मिक भावना दुखावणे व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या लड्डू उर्फ हसन हाशमी कुरेशी, जमील इस्माईल कुरेशी व फैजान अब्दुला कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्यावरही मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, हवेली, इंदापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

याशिवाय महेश रमेश चोरमले (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (ब) अंतर्गत कारवाई करून त्यास पुणे, सोलापूर, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

दौंड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही प्रस्ताव सुनावणीसाठी प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (ब) अंतर्गत २ गुन्हेगारांवर, कलम ५५ अंतर्गत ९ गुन्हेगारांवर तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत ३ गुन्हेगारांवर कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, भांडणे, मारामाऱ्या, शिवीगाळ, दमदाटी करून शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कलम १२९ अंतर्गत २३३ गुन्हेगारांवर, कलम १२६ अंतर्गत ८०४ गुन्हेगारांवर तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत २९ गुन्हेगारांकडून शांतता राखण्याबाबत बॉण्ड घेण्यात आले आहेत.

तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ अंतर्गत कारवाई करून १७ गुन्हेगारांकडून दोन वर्षांसाठी चांगल्या वर्तणुकीचे अंतरिम बंधपत्र घेण्यात आले आहे.

दौंड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.


Translate »
error: Content is protected !!