तरुणांनी राजकीय सत्ता हातात घ्या, शहराचा कायापालट करा—लंगोटे यांची हाक..!
🔥MK NEWS36
दुर्गादेवी जगदाळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा – लंगोटे
सचिन आटोळे
दौंड (विशेष राजकीय प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन दौंड शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस नारायण आप्पा लंगोटे यांनी केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत ते बोलत होते.
लंगोटे म्हणाले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण नेतृत्वाला संधी देणे ही काळाची गरज आहे. शहरातील तरुणांनी एकत्र येऊन राजकीय सत्तेवर आपली मजबूत पकड निर्माण केली पाहिजे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे.”
दुर्गादेवी जगदाळे या तरुण नेत्या असून शहराच्या विकासाची उत्तम जाण त्यांना आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या घरातील राजकीय वारसा, अनुभव आणि नेतृत्वगुण हा त्यांच्या ताकदीचा मोठा आधार असल्याचे लंगोटे यांनी स्पष्ट केले.
दुर्गादेवी यांच्या पिताश्रींनी दौंड शहराचे नगराध्यक्ष म्हणून व्यापक विकासकामे करून शहराला नवा चेहरा दिला. तसेच त्यांच्या चुलत्यांनी ग्रामीण भागात प्रभावी नेतृत्व करत विकासाची नवी दिशा दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीमुळे दुर्गादेवी जगदाळे या शहराचा विकास वेगाने करण्यास सक्षम असल्याचा विश्वास लंगोटे यांनी व्यक्त केला.
“ज्येष्ठांची साथ आणि तरुणांची उमेद एकत्र आली तर दौंड शहराचा कायापालट होणारच,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून दुर्गादेवी जगदाळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.



