दौंड उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची अरेरावी; रुग्ण-नातेवाईक त्रस्त?
🔥MK NEWS36
दौंड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह
रुग्ण व नातेवाईकांशी असभ्य भाषा; कठोर कारवाईची मागणी
दौंड प्रतिनिधी – कोमल सोनवणे
दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत कर्मचाऱ्यांकडून असभ्य व उद्धट वर्तन होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयातील काही कर्मचारी तसेच साफसफाई कर्मचारी रुग्णांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना चुकीच्या शब्दांत बोलणे, उद्धटपणे उत्तर देणे आणि “तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
काही कर्मचारी “आम्ही दौंडमध्येच राहतो, आमच्या विरोधात कोणी काही करू शकत नाही,” असे म्हणत नागरिकांना दमदाटी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, रुग्णालयातील स्वच्छता व रुग्णसेवा सुधारण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. प्रशासनाने या गंभीर तक्रारींची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




