संपूर्ण शहरात संभ्रम: दोन प्रभागांचीच की संपूर्ण नगरपालिकेची पुन्हा निवडणूक?
🔥MK NEWS36
बारामती | प्रतिनिधी
शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच अशी वेळ आली आहे की आधी घोषित झालेली नगरपालिका निवडणूक रद्द करून नव्या तारखांची प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे. या अभूतपूर्व घडामोडीमुळे बारामतीत राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्येही “आता पुढे नक्की काय होणार?” याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणूक रद्द झाल्यानंतर आता सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिला आहे – संपूर्ण बारामतीत पुन्हा निवडणूक होणार की ज्याठिकाणी वाद निर्माण झाले ते दोनच प्रभाग ‘री-इलेक्शन’च्या टप्प्यात येणार? अधिकृत निर्णय अद्याप न आलेला असला तरी या अनिश्चिततेमुळे उमेदवार, पक्षकार्यकर्ते आणि जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
यातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्यांनी मागील निवडणुकीत “गुडघ्याला बाशिंग बांधून” म्हणजेच तणावाखाली, अनिश्चिततेत अर्ज भरले होते, त्यांच्यात आता पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. नव्याने उमेदवारीची संधी मिळणार की नाही यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारे निर्णय बारामतीच्या राजकारणाला नवीन वळण देऊ शकतात, अशी चर्चासुद्धा रंगू लागली आहे.
दुसरीकडे, मागील फॉर्म भरताना – कोण विरोधात उभा राहिला, कोणाने गुपचूप दबावराजकारण केले, कोणी पाठीमागून काम केले, तर कोणी संघटितपणे पाठीशी उभा राहिला – हे सर्व चेहरे आता स्पष्ट झाले आहेत. यामुळे जर नव्याने निवडणूक जाहीर झाली, तर त्याचा सर्वाधिक परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावर होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. कारण लोकांच्या मनात नाराजीचा सुर वाढलेला दिसतो आहे आणि “पार्टी सांगेल ते ऐकू” ही मानसिकताही आता कमी होत चालल्याचे संकेत आहेत.
निवडणूक रद्द, नव्या तारखांची प्रतीक्षा, उमेदवारांमध्ये नव्या जोमाची लगबग आणि नागरिकांमध्ये वाढलेली उत्सुकता – या सर्वामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल जोरात वाजू लागला आहे.
सध्या तरी बारामतीचे राजकारण अनिश्चिततेच्या वळणावर उभे असले तरी पुढील काही दिवसांत काय निर्णय होतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शहरातील चहाटळ खडेपासून ते राजकीय कार्यालयांपर्यंत एकच चर्चा – “निवडणूक पुन्हा झाली तर खेळ कोणाचा बनेल?”
बारामतीत पुढील काही दिवस निश्चितच अत्यंत रंगतदार ठरणार, एवढे मात्र निश्चित!




