. फिटनेस सर्टिफिकेटचा फसवा खेळ – बारामती आरटीओची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात..!
🔥MK NEWS 36 संपादकीय
बारामती – बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास झाला. एम.एच. ४२ ए.क्यू. ३२९० क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि बेफिकिरीने वाहन चालवून अपघात घडविला. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चालक अपघातानंतर पसार झाला.
या घटनेवरून बारामती आरटीओ कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शहरातील मुख्य मार्गावर दिवसेंदिवस कंटेनर, ट्रक आणि जड वाहनांची बेफाम वाहतूक सुरू आहे. नियम, अटी, स्टिकर, लाल दिवे, फिटनेस सर्टिफिकेट – हे सगळं कागदावर आहे; पण प्रत्यक्ष रस्त्यावर काहीच पालन होत नाही.
कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवत आहेत, लहान टू-व्हीलर व थ्री-व्हीलर वाहनांना धडक देत आहेत, आणि आरटीओ मात्र मुकाटपणे गप्प आहे. नागरिकांचा प्रश्न एकच — “आरटीओ ऑफिसचं काम फक्त किसे भरणं आहे का?”
वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट दिले जातात, पण त्या गाड्या प्रत्यक्षात फिट आहेत का? धूर सोडणाऱ्या, ब्रेक न चालणाऱ्या, दिवे बंद असलेल्या वाहनांना रस्त्यावर उतरवले जाते. हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा आहे.
आरटीओ विभागाने या सर्वावर तात्काळ कारवाई करून अशा निष्काळजी आणि धोकादायक वाहनांवर लगाम घालावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. अन्यथा — पुढचा अपघात फक्त बातमी राहणार नाही, तर मोठा जीवितहानीचा प्रसंग घडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




