ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“बारामतीत पथविक्रेत्यांचा एल्गार; नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन”


🔥MK NEWS36

बारामतीत पथविक्रेत्यांचा संताप उसळला; नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

बारामती, प्रतिनिधी:

बारामती शहरातील पथविक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ युवा पँथर पथविक्रेता व फेरीवाला संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या २० एप्रिल २०२६ रोजी बारामती नगर परिषदेसमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.

बारामती शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून अधिकृत नोंदणी करणे, शहरात हॉकर्स झोन निश्चित करणे तसेच व्यवसायासाठी स्थिर जागा उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विकसित शहराच्या नावाखाली पथविक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाया करून त्यांना व्यवसायापासून वंचित केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहरातील अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे हातगाडे व स्टॉल लावून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांना हटवून त्याच जागांवर गाळे उभारून विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे “विकासाच्या नावाखाली गरिबांच्या पोटावर पाय दिला जातोय का?” असा सवाल संतप्त पथविक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात हॉकर्स झोन निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आजतागायत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले असून, प्रशासनाने वेळीच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


Translate »
error: Content is protected !!