वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची तातडीची गरज; सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड आग्रही..!
🔥MK NEWS36
वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची तातडीची गरज; सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड आग्रही
दौंड | प्रतिनिधी
वन्यजीव, पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत पाणवठे उभारण्यात यावेत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी वनाधिकारी राहुल काळे यांच्याकडे केली आहे. या मागणीला आमदार राहुल दादा कुल यांनीही पाठिंबा देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
काळेवाडी, देऊळगाव राजे, ज्योतिबानगर, मलठण, बोरीबेल, रावणगाव, राजेगाव, खडकी, खानोटा, वाटलुज, नायगाव, स्वामी चिंचोली आदी गावांच्या परिसरात पाणवठे उपलब्ध झाल्यास वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होईल, तसेच वेळेवर पाणी मिळाल्याने त्यांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, वन्यजीवांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला. काही समाजकंटकांकडून वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार सुरू असून, जाळी लावणे, राखी पेटवून परिसर जाळणे अशा प्रकारांमुळे वन्यजीव अडकून शिकार करणे सोपे केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे वन्यजीवांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड वनविभागाने खास गुप्तहेर यंत्रणेमार्फत या प्रकारांची सखोल चौकशी करावी, संबंधितांना कडक समज देऊन असे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पाणवठे उभारणीसह शिकारीविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




