गोवंश तस्करीविरोधात बारामती पोलिसांचे कडक पाऊल — वाहन जप्त, आरोपींवर कठोर कारवाई सुरू…!
🔥MK NEWS36
बारामती — गोवंश तस्करीप्रकरणी पिकअप वाहन पकडले; चार दुभत्या गायींची सुटका
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!
बारामती, दि. 29 नोव्हेंबर 2025 — महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम 2015 तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे उल्लंघन करून चार दुभत्या गायींची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत एक पिकअप वाहन अडवून गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुप्त माहिती आणि झटपट कारवाई
बजरंग दलाचे अध्यक्ष युवराज डाळ व सोबती अक्षय देवकाते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जेजुरीहून सांगोला दिशेने कत्तलीसाठी गायी नेत असल्याचा संशय होता. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी पो.शि. अक्षय सिताप, पो.शि. गिरीष नेवसे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले.
ईरा स्कूलजवळ पिकअप वाहन पकडले
सायंकाळी अंदाजे 07:30 वाजता गुणवडी रोडवरील ईरा स्कूलजवळ संशयित पिकअप (MH-12-YB-4080) पोलिसांनी अडवले. तपासणीदरम्यान वाहनात 4 दुभत्या गायी अमानुषरीत्या कोंबून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या. चारा–पाणी नव्हते आणि कोणताही विधिसम्मत परवाना चालकाकडे नव्हता.
चालकाची कबुली — ‘गायी सांगोला येथे कत्तलीसाठी’
चालक सलमान ईमानदार व क्लिनर चंद्रकांत बरडे यांनी साक्षीदारांसमक्ष कबुली दिली की, दलाल दत्ता पवार यांच्या माध्यमातून सांगोला येथे कत्तलीसाठी या गायी पोहोचविण्यासाठी ₹7000/- भाड्यावर त्यांना पाठविले होते.
गायी गोशाळेत हलविण्यात आल्या; वाहन जप्त
पोलिसांनी गायींना प्रथम पाणी देऊन सुरक्षिततेसाठी हंबिरराव मोहिते गोशाळा (झेंडेवाडी/सासवड) येथे दाखल केले. गायींची अंदाजे किंमत ₹1,45,000/- इतकी असून पिकअप वाहनही जप्त करण्यात आले.
गंभीर कलमानुसार गुन्हा नोंद..
सदर प्रकरणात महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व संवर्धन अधिनियम 2015 चे कलम 5, 5A, 9, 11 तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(a)(b)(m)(e)(h), मोटार वाहन अधिनियमाचे विविध कलम व भारतीय न्याय संहिता कलम 291, 3(5) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक श्री गिल यांनी या प्रकरणास ‘संघटित गुन्हा’ म्हणून बीएनएस कायदा कलम 111 नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असून, आरोपी चालक, क्लिनर, दलाल आणि गायी विकणारे शेतकरी यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, तर बारामती शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पोलीस उप-निरीक्षक अशोक राऊत करत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन..!
गोवंश तस्करी, अवैध वाहतूक व कत्तल ही गंभीर गुन्हेगारी असून अशा प्रकारची माहिती नागरिकांनी त्वरित बारामती शहर पोलीस स्टेशनला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
— बारामती शहर पोलीस स्टेशन..!




