पक्षात जातीय राजकारण होत असल्याचा आरोप; दौंड काँग्रेसमधील नाराजीने गाठले टोक!
🔥MK NEWS36
दौंड काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस उफाळली! काही बडे कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत? राजकीय वर्तुळात खळबळबळ
दौंड, (विशेष प्रतिनिधी):
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंड शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. दौंड शहर काँग्रेस कमिटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसपुसत असलेली अंतर्गत नाराजी अखेर चव्हाट्यावर आली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, पक्षातील काही खंदे आणि नाराज कार्यकर्ते लवकरच ‘एकला चलो रे’ ची किंवा वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असून, ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दौंड काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जाते.

🎈गटबाजी आणि नेत्यांच्या हुकूमशाहीला कार्यकर्ते कंटाळले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने आता टोक गाठले आहे. पक्षात केवळ काही मोजक्याच नेत्यांचे वर्चस्व वाढले असून, निष्ठावंत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात आहे. पक्षासाठी अहोरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणतेही महत्त्व मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
✅पक्षात जातीय राजकारणाचा वास?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पक्षात जाणीवपूर्वक ‘जातीय राजकारण’ केले जात असल्याची भावना काही नाराज कार्यकर्त्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे. एका विशिष्ट चौकटीतच पक्षाचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नाव न सांगण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, या खळबळजनक आरोपांबाबत संबंधित स्थानिक नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समजू शकलेली नाही.
💥पक्षश्रेष्ठींची कसोटी; परिस्थिती चिघळणार की डॅमेज कंट्रोल होणार?
या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे दौंड शहरातील काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या कठीण प्रसंगात काँग्रेसचे वरिष्ठ पक्षश्रेष्ठी तात्काळ हस्तक्षेप करून या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार की ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात अपयशी ठरणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जर वरिष्ठांनी वेळीच पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
💢स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मौन!
दरम्यान, शहरात एवढी मोठी राजकीय वावटळ उठलेली असतानाही काँग्रेसच्या स्थानिक मुख्य पदाधिकाऱ्यांकडून किंवा शहराध्यक्षांकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नेत्यांनी बाळगलेले हे ‘मौन’ बरेच काही सांगून जात असून, पुढील काही दिवसांत दौंडच्या राजकीय पटलावर मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




