इंदापूर-माळशिरसमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा, रणगावातून प्रकार उघड?
🔥MK NEWS36
🛑 रणगाव उपकेंद्राला कुलूप – आरोग्य यंत्रणेचा बेफिकिरीचा कळस उघड!
सागर समिंदर (प्रतिनिधी)
इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील आरोग्य उपकेंद्र आज पूर्णतः बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे उपकेंद्र निरवांगीच्या कार्यक्षेत्रात येत असून, येथे समुदाय डॉक्टर, आरोग्य सेवक, सिस्टर व इतर कर्मचारी यांनी अक्षरशः कुलूप लावून केंद्र बंद ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागत आहे.

स्थानिकांच्या मते, हे एकदाचं प्रकरण नसून अशा प्रकारची मनमानी सातत्याने सुरू आहे. उपकेंद्रात डॉक्टर व कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाकडून पगार घेत असताना सेवा देण्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

इंदापूर तालुक्याला कॅबिनेट मंत्री असतानाही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस, पळसमंडळ यांसारख्या भागांमध्येही अशीच अवस्था असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच विस्कळीत झाल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध उपकेंद्रांवर अचानक भेटी देऊन लाईव्ह फोटो, जीपीएस लोकेशनसह पुरावे गोळा केले जात असून, येत्या काळात या सर्व बाबी जनतेसमोर मांडल्या जाणार आहेत.
स्थानिक नागरिकांचा एकच सवाल आहे — “काम न करता फक्त पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?”
जर प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर ही मोहीम आणखी तीव्र करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू शकते.
आरोग्य सेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र रणगावसारख्या गावांमध्ये हा हक्कच कुलूपबंद झाल्याचे वास्तव समोर आले आहे. आता प्रशासन जागे होणार की ही मनमानी असंच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




