पोलीस निरीक्षक गप्प का? अवैध मटका प्रकरणी प्रशासनावर गंभीर आरोप..!
🔥MK NEWS36
अवैध मटका धंद्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयदीप बगाडे आक्रमक
प्रजासत्ताक दिनी दौंड पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
दौंड | प्रतिनिधी
दौंड शहरात अवैध मटका जुगाराचा धंदा खुलेआम सुरू असून, संबंधित यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा न्यू महाराष्ट्र पँथर सेना, दौंडचे अध्यक्ष जयदीप बगाडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी खुले पत्र प्रसिद्ध करत दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांवर थेट बोट ठेवले आहे.
दौंड शहरात काही विशिष्ट त्रिकुटाच्या माध्यमातून मटका शेठांच्या आशिर्वादाने अवैध मटका धंदा तेजीत सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही बगाडे यांनी केला आहे. आर्थिक तडजोडीबरोबरच राजकीय आश्रयामुळे हा गुन्हेगारी प्रकार वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, दौंडचे लोकप्रतिनिधी आमदार राहुल दादा कूल यांनीही या गंभीर विषयावर मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करत बगाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींच्या शांत भूमिकेमुळेच पोलीस प्रशासनावर कोणताही दबाव नसल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जयदीप बगाडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दिनांक १९ जानेवारी २०२६ पासून दौंड शहरातील कोणत्याही भागात अवैध मटका धंदा सुरू आढळून आला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची राहील. तसेच, त्यांच्याविरोधात कामात कुचराई केल्याबद्दल शिस्तभंगाची मागणी पोलिस प्राधिकरणाकडे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दौंडचे डी.वाय.एस.पी. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अवैध मटका धंदा बंद न केल्यास, येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी दौंड पोलीस ठाण्यासमोर वाद्य वाजवत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
या खुल्या पत्रामुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली असून, आता वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




