पत्रकारितेवर घातक प्रहार; त्र्यंबकेश्वर पोलिस तपासात गुंतले?
🔥MK NEWS 36
नाशिक – त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून निषेध, दोषींवर कडक कारवाईस सूचना..
त्र्यंबकेश्वर (दि. 20 सप्टेंबर 2025) – नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेत तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली. पत्रकारांनी वार्तांकनासाठी परिसरात पोहोचल्यावर गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यातील एक पत्रकार गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गंभीर भूमिका घेतली आहे. पत्रकार संघटनांनीही या प्रकरणाचा निषेध नोंदवला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत निषेध नोंदवला आहे. ते अपोलो हॉस्पिटलमध्ये जखमी पत्रकारांची भेट घेऊन त्यांची तब्येत विचारपूस केली. छगन भुजबळ यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रात्री नाशिकमध्ये पोहोचून जखमी पत्रकारांची भेट घेणार आहेत.
या घटनेमुळे पत्रकारितेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार मानला जात आहे.



